Satbara Utara सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात विश्वासू कागद. वडीलधार्यांकडून मिळालेली जमीन असो किंवा स्वतःच्या कष्टातून जमवलेली असो, सातबारा हीच त्या जमिनीची ओळख असते. पण अनेकांना अजूनही प्रश्न पडतो – “सातबारा म्हणजे काय?”, “भोगवटाधार वर्ग 1, 2, 3 म्हणजे काय?”, “या कागदाचा उपयोग काय?”
या लेखात आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

सातबारा उतारा (Satbara Utara) म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 यांचा एकत्रित फॉर्म.
गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, ती कोणत्या प्रकारची आहे, मालक कोण आहे, कर किती लागतो, याची माहिती असते.
गाव नमुना 12 मध्ये त्या जमिनीवर कोणती पिकं घेतली, सिंचन स्रोत काय होता, याची नोंद असते.
सातबारा कसा तयार झाला?
1910 मध्ये “जमीन बंदोबस्त योजना” सुरू झाली, त्यात जमिनीचं मोजमाप केलं गेलं.
त्यानंतर 1930 मध्ये इंग्रजांनी “जमाबंदी” लागू केली. यात अधिकृतपणे जमीनधारकांची माहिती आणि वसुलीची नोंद झाली.
याच वेळी सातबारा उताऱ्याचा नमुना तयार झाला आणि आजही तोच पद्धत वापरली जाते.
भोगवटाधार वर्ग म्हणजे काय?
सातबाऱ्यावर “भोगवटाधार” असा उल्लेख असतो. याचा अर्थ जमिनीचा काय प्रकार आहे ते.
1. वर्ग 1: स्वतंत्र मालकी, विक्रीसाठी कोणतेही अडथळे नाहीत.
2. वर्ग 2: इनाम, वतन, वाटप केलेल्या जमिनी – विक्रीसाठी सरकारी परवानगी आवश्यक.
3. वर्ग 3: सरकारी जमीन.
4. वर्ग 4: भाडे तत्वावर 10, 30, 50, 99 वर्षांसाठी दिलेली सरकारी जमीन.
सातबारा उताऱ्यावर असणारी माहिती
गट/सर्वे क्रमांक
मालकाचं नाव
जमिनीचं क्षेत्रफळ (हेक्टर व आर मध्ये)
जमीन जिरायत की बागायत
शेतीस योग्य की अयोग्य
पिकांची नोंद
कर्जाची नोंद (बियाणे, खत, इ.)
जलसिंचनाचा प्रकार
सातबारा उताऱ्याचा उपयोग
जमीन विक्री/खरेदीसाठी – मालकीची खात्री.
बँकेकडून कर्ज घेण्यासाठी – प्रमुख कागद.
कोर्ट प्रकरणात – कायदेशीर पुरावा.
शासकीय योजनांसाठी – कर्जमाफी, पीकविमा इ.
जमिनीचा इतिहास पाहण्यासाठी – आधी कोण मालक होता, काय वाद आहेत का?
नवीन बदल काय आहेत?
आता सातबाऱ्यावर राज्य सरकारचा लोगो आणि वॉटरमार्क असतो.
गावाचा कोड, उतपरिवर्तन क्रमांक, जमिनीचा वापर हेतू नमूद केला जातो.
एकूण 12 बदल हे कागद फसवणूक टाळण्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत.सरकार ने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा मिळवण्यासाठी एक संकेतस्थळ निर्माण केले आहे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळवर जाऊन आपण आपला सातबार मिळवू शकता.
निष्कर्ष
सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीचा आरसा आहे. या कागदावरून शेतजमिनीची संपूर्ण माहिती मिळते. कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे, कोणते पीक घेतले आहे, किती कर लागतो, कर्ज आहे का – या सगळ्या गोष्टी स्पष्ट कळतात. त्यामुळे जमीन व्यवहार करताना किंवा सरकारी योजनांचा लाभ घेताना हा दस्तावेज अत्यंत आवश्यक ठरतो.