mati prikshan हंगाम सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करणं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षण म्हणजे शेतातील मातीचं आरोग्य तपासणं – त्यात कोणती अन्नद्रव्यं आहेत, काय कमी आहे, आणि कोणत्या पिकासाठी ती माती योग्य आहे हे समजून घेणं. परीक्षणासाठी 1 एकर क्षेत्रातून 7 ते 8 ठिकाणी 45 सेंटीमीटर खोल माती घेऊन योग्य पद्धतीनं नमुना तयार करावा आणि तो प्रयोगशाळेत पाठवावा. या चाचणीतून योग्य खतांचा वापर करता येतो, अति खतवापर टाळता येतो, खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हंगामापूर्वी माती परीक्षण करून शाश्वत आणि नफेखोर शेतीसाठी योग्य निर्णय घ्यावा. माती परीक्षण चे महत्व आणि फायदे याची सविस्तर माहिती घेऊया.

शेतकरी मित्रांनो, जसं माणसाचं आरोग्य तपासण्यासाठी वैद्याकडे जावं लागतं, तसंच आपल्या शेताच्या मातीचं आरोग्य जाणून घेण्यासाठी “माती परीक्षण” करणं गरजेचं असतं.
माती परीक्षण (mati prikshan) म्हणजे काय?
माती परीक्षण म्हणजे आपल्या शेतातील माती तपासून बघणं की त्यात कोणती अन्नद्रव्यं (जसंत की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश) आहेत आणि कोणती कमी आहेत. यामुळे आपल्याला हे समजतं की आपली माती कुठल्या पिकासाठी योग्य आहे आणि कोणत्या खताची गरज आहे.
माती परीक्षण कोठे करता येते?
माती परीक्षण करण्यासाठी खालील ठिकाणी तुम्ही नमुना देऊ शकता:
- कृषी विज्ञान केंद्र (KVK) – प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र असतं. इथे माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध असते.
- जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय – जिल्हा स्तरावर माती परीक्षण प्रयोगशाळा असतात. तुमच्या तालुक्याच्या कृषी विभागाशी संपर्क करा.
- खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा – काही खाजगी कंपन्या व प्रयोगशाळा देखील प्रमाणित चाचणी करून अहवाल देतात.
- ऑनलाइन अर्जाद्वारे – महाराष्ट्र शासनाच्या ‘महापोर्टल’ किंवा https://soilhealth.dac.gov.in या वेबसाइटवरूनही माती परीक्षणासाठी अर्ज करता येतो.
- शेती सेवा केंद्र / कृषी सेवा संस्था – अनेक ठिकाणी कृषी केंद्रांमधून नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत पाठवले जातात.
टीप: नमुना देताना शेतकऱ्याचं नाव, गट नंबर, मागील पीक आणि पुढील नियोजित पीक याची माहिती द्यावी लागते. अहवाल साधारणपणे 7–10 दिवसात मिळतो.तुमच्या गावाजवळचे माती परीक्षण केंद्र शोधण्यासाठी जवळच्या कृषी सहायक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधा.
माती परीक्षण कसं करावं?
- १ एकर शेतासाठी सुमारे ७ ते ८ ठिकाणांहून मातीचे नमुने घ्या.
- खालील ठिकाणची माती टाळा –
- शेणखत टाकलेली जागा
- झाडांच्या सावलीतील जागा
- पाणी साचलेली जागा
- जनावरं बांधलेली जागा
- प्रत्येक ठिकाणी ४५ सेंटीमीटर खोल खड्डा खोदून V आकाराची माती घ्या.
- ही माती एका स्वच्छ गोणपाटावर टाका आणि चांगलं मिसळा.
- हे मिश्रण ४ भागात वाटून २ भाग बाजूला काढा. उरलेले २ भाग एकत्र करा.
- उरलेली माती एका स्वच्छ कापडी पिशवीत भरून त्यात एक चिठ्ठी ठेवा.
- या चिठ्ठीत शेतकऱ्याचं नाव, गट नंबर, मागील पीक आणि पुढील पीक याची माहिती लिहा.
माती परीक्षणाचे फायदे काय?
कस असलेली माती ओळखता येते
मातीमध्ये कोणती ताकद (अन्नद्रव्यं) आहे आणि काय कमी आहे, हे कळतं.
योग्य खत टाकता येतं
अंदाजाने खत टाकण्याऐवजी योग्य खत, योग्य प्रमाणात वापरता येतं.
खर्च कमी होतो
गरज नसलेल्या खतांवरचा खर्च वाचतो, पैशांची बचत होते.
पिकाला पोषण योग्य मिळतं
माती योग्य असल्यामुळे पिकं चांगली वाढतात आणि रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
उत्पादन वाढतं
मातीला जे लागेल ते दिल्याने शेतीतून अधिक उत्पादन मिळतं.
जमिनीचं आरोग्य टिकतं
अति खतं टाळल्यामुळे मातीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते.
पुढील पीक काय घ्यावं हे ठरवता येतं
कोणतं पीक मातीसाठी योग्य आहे, हे समजल्यामुळे चांगला नफा मिळवता येतो.
तज्ज्ञांचं मत काय सांगतं?
कृषी विज्ञान केंद्र, जालना येथील मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी सांगतात की, खरीप हंगाम सुरू होण्याआधी माती परीक्षण केल्यास योग्य पीक निवड, खत व्यवस्थापन आणि उत्पादन क्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे नक्की करावं.
शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण ही फार मोठी गुंतवणूक नाही, पण त्याचे परिणाम मोठे असतात. जर शेताचं आरोग्य समजलं, तर योग्य पीक आणि योग्य खत निवडणं सहज शक्य होतं. त्यामुळे हंगाम सुरू होण्याआधी माती परीक्षण करून, उत्पादन वाढवण्याची दिशा घ्या.