farmer id नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कृषी आणि ग्रामविकास योजनांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी फार्मर आयडी (farmer id) सक्तीचा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिवराज सिंह चौहान यांनी फार्मर आयडी मोहिमेला गती देण्यावर भर देत, महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत हवामानानुसार पीक वाण विकसित करणे, प्रगत बियाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा प्रसार करणे, स्मार्ट सिंचन प्रणाली आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्यावर चर्चा झाली. कमी पावसाच्या भागांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती आणि त्या भागासाठी उपयुक्त पीक पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला.
राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या कार्यपद्धती देशभर पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या यशोगाथांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले. बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, जनमन, ग्रामसडक योजना आणि मनरेगा यांसारख्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. मनरेगामध्ये झालेल्या प्रगतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चौहान यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे नमूद करत, ‘लखपती दीदी’ योजनेतून एक कोटी महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारच्या कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले.
farmer id या बैठकीस ग्रामविकास मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत घेतले गेलेले निर्णय राज्याच्या ग्रामीण आणि कृषी विकासासाठी दिशादर्शक ठरणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.