DAIRY FARMING SUCCESS STORY : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील रिसे हे गाव जिरायती पट्ट्यात मोडतं. या गावातील फक्कड कामथे यांच्याकडे तब्बल 25 एकर शेती आहे. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीवर अनेक अडथळे निर्माण झाले. पूर्वी काकडी, कलिंगड, टोमॅटो अशी हंगामी पिकं घेऊन मुंबई-वाशी मार्केटमध्ये चांगली विक्री चालायची. पण पाण्याअभावी शेतीवर मर्यादा आल्या. तरीही हार न मानता त्यांनी शेतीच्या जोडीने दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि आज या क्षेत्रात ते मोठं यश मिळवत आहेत.

फक्त एका गायीपासून सुरुवात – आज आहेत 65 जनावरं
फक्कड कामथे यांनी सुरुवातीला एका गायीपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली. ही गाय तब्बल 13 वेळा वेत देत गेली. त्यानंतर एका संकरित गायीची भर पडली. टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढवता वाढवता, आज त्यांच्या गोठ्यात 65 जनावरे आहेत. यामध्ये गायी, वासरे, बैल आदींचा समावेश आहे. गोठ्याची रचना “मुक्त संचार पद्धती”ने केली आहे. जनावरांना मोकळं फिरता येतं, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दूध उत्पादनही वाढतं.
पाण्याची टंचाई – पण मुरघासामुळे चाऱ्याची सोय DAIRY FARMING
खोपडे वस्ती परिसरात गेल्या दोन वर्षांपासून इंचभरही पाणी नाही. त्यामुळे शेतात चारा घेणं शक्य झालं नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी कामथे कुटुंबाने मका खरेदी करून 150 टन मुरघास तयार केला. यातील 80 टन मुरघास वापरण्यात आला असून 70 टन अजून शिल्लक आहे. गळीत हंगामात उरसा वापरून आणि इतर पिकांचा चारा खरेदी करून जनावरांचा आहार पुरवला जातो. मका चारा एकरी 60 ते 65 हजार रुपये इतक्या दराने विकत घेतला जातो.
सर्व कुटुंब एकीने काम करते
फक्कड कामथे कुटुंबातले सगळे सदस्य व्यवसायात सहभागी आहेत. फक्कड, पत्नी संजना, मुले प्रमोद आणि रवींद्र, सुना वैशाली व रूपाली, पुतणे नितीन आणि त्यांची पत्नी रेश्मा – सगळ्यांची मेहनत या व्यवसायामागे आहे. दररोज 40 ते 50 किलोमीटर लांब जाऊन चारा आणला जातो. सकाळी लवकर उठून ट्रॅक्टर घेऊन चाऱ्यासाठी जाणं, दर ठरवणं, चाऱ्याची पाहणी करणं – हे सगळं काम याच कुटुंबाच्या मेहनतीमुळे यशस्वी होतं.
नवा प्रयोग – ब्रॉयलर कुक्कुटपालनाची सुरूवात
दुग्ध व्यवसायासोबतच त्यांनी ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू केलं आहे. एक महिन्यापूर्वी 165 बाय 30 फूट आकाराचं शेड उभारलं असून त्यासाठी 10 लाख रुपयांचं बँकेचं कर्ज घेतलं आहे. सध्या 3,500 पक्ष्यांचं संगोपन चालू आहे. एका कंपनीसोबत करार करून व्यवसाय सुरू केला आहे. सध्याच्या उष्णतेतही पक्षांचं वजन 1.25 ते 1.5 किलो पर्यंत पोहचलं असून मरतुक खूप कमी आहे.
DAIRY FARMING SUCCESS STORY शिकवण काय?
कामथे कुटुंबाची ही कथा आहे (DAIRY FARMING SUCCESS STORY) संकटांवर मात करत यशाकडे वाटचाल करणाऱ्या जिद्दी शेतकऱ्यांची. पाण्याची टंचाई असली तरी त्यांनी हार मानली नाही. एका गायीपासून सुरुवात करून आज ते 65 जनावरं सांभाळत आहेत आणि त्यातून स्थिर उत्पन्न घेत आहेत. याचबरोबर कुक्कुटपालन करून व्यवसायाला नवीन दिशा दिली आहे. हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे की, मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाची एकजूट असल्यास कोणतीही अडचण पार करता येते.