Contract Farming : करार शेती म्हणजे काय? मित्रांनो, आजचं शेतीचं जग खूप बदललं आहे. पूर्वी शेतकरी काय करत असत? आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करायची, मग पिक कसं आलं, काय दर मिळाला, यावर त्याचं भविष्य ठरायचं. पण आता काळ बदलतोय. कारण आता आपण जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करत आहोत. त्यामुळे शेतीतही नक्कीच बदल हवा आहे , आणि हा नवीन बदल म्हणजेच – करार शेती.

करार शेती म्हणजे काय (Contract Farming) असतं?
सरळ शब्दात सांगायचं झालं, तर करार शेती म्हणजे शेतकरी आणि एखादी संस्था/कंपनी यांच्यात पिक उत्पादनाबाबत अगोदरच ठरलेला करार. यात कंपनी शेतकऱ्याला सांगते, “तुम्ही अमुक एक पिक पिकवा, आम्ही तुम्हाला ठराविक दराने तो माल खरेदी करू.” एवढंच नाही, तर कंपनी शेतकऱ्याला योग्य बियाणं, सल्ला, कधी कधी खते-सिंचनाचं मार्गदर्शनसुद्धा करते.
करार शेती का करतात कंपन्या?
कंपन्यांना बाजारात आपल्या उत्पादनासाठी विशिष्ट दर्जा लागतो. जसं की एखादी पोटॅटो चिप्स बनवणारी कंपनी खास प्रकारच्या बटाट्याचा मागणी करते. तिला हवा असतो खास दर्जा. म्हणून ती शेतकऱ्याशी करार करते आणि त्याच प्रकारचा बटाटा मागते. म्हणजे कंपनीला हवी ती क्वालिटी मिळते आणि शेतकऱ्याला निश्चित दर मिळतो.
शेतकऱ्याला याचा काय फायदा?
- हमी दर – पिक घेतल्यावर माल कुठे विकायचा, किती दर मिळेल, या चिंतेतून मुक्तता.
- सल्ला आणि मदत – कंपनीकडून मार्गदर्शन, काही वेळा बियाणं-खतही दिले जाते.
- मार्केटिंगची गरज नाही – माल विकायला शेतकऱ्याला फिरण्याची गरज राहत नाही.
- दर्जेदार उत्पादनाचं प्रशिक्षण – कंपनी कडून मिळणाऱ्या प्रशिक्षण यामुळे पुढच्यावेळी शेतकरी स्वबळावरही चांगलं उत्पादन घेऊ शकतो.
कंपनीचाही फायदा असतो
कंपनीला हवी ती क्वालिटी, हवे तेवढं प्रमाण आणि वेळेवर माल मिळतो. शिवाय उत्पादन प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे शेतकरी आणि कंपनी दोघांचाही फायदा होतो.
एक उदाहरण बघूया – कुक्कुटपालन
कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मिंग – हे करार शेतीचंच उत्तम उदाहरण आहे. येथे कंपन्या शेतकऱ्यांना चारा, औषधं, प्रशिक्षण देतात. आणि शेवटी त्यांच्याकडून ठराविक दराने चिकन विकत घेतात. शेतकऱ्याचं उत्पन्न निश्चित, आणि कंपन्यालाही फायदा.
कोणकोण सहभागी असतो या करारात?
- शेतकरी – माल तयार करणारा शेतकरी.
- कंपनी – माल घेणारी आणि सल्ला देणारी कंपनी.
- बँका/संस्था – कर्ज किंवा अर्थसहाय्य करणाऱ्या बँका.
- विमा कंपन्या – पिक बिघडल्यास संरक्षण देणाऱ्या कंपन्या.
करार शेतीत जोखीम कमी का असते?
शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे अनिश्चितता असते. पण करार शेतीमुळे बाजारभावाचं, माल विक्रीचं टेंशन राहत नाही. जोखीम कमी होते. कंपनीकडून कधीमधी पिकासाठी विमा संरक्षणही दिलं जातं.
निष्कर्ष
करार शेती म्हणजे काय , तर करार शेती ही शेतकऱ्यांसाठी एक नवीन संधी आहे. नुसतेच पिक घेऊन काय करायचं, कसा विकायचा याची चिंता न करता, शेतकरी आता आधीपासूनच कंपनीशी करार करून, हमी दर आणि सल्ल्याच्या आधारावर व्यवसाय करू शकतो. शेतकऱ्यांना मालाची गुणवत्ता चांगली मिळवण्यासाठी कंपनी कडून प्रशिक्षण देखील दिले जाते.