माती परीक्षण कसे करावे..

माती परीक्षण कसे करावे : माती परीक्षण म्हणजे आपल्या जमिनीत कोणती अन्नद्रव्यं आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे आणि ती पिकांसाठी योग्य आहे की नाही, हे तपासण्याची प्रक्रिया होय. जशी आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जाऊन रक्ताची तपासणी करतो, तशीच मातीचीही ‘ब्लड टेस्ट’ समजली जाते. हे परीक्षण करण्यासाठी शेतामधून मातीचा नमुना योग्य प्रकारे घ्यावा लागतो. यासाठी वाफ्यावर झिगझॅग पद्धतीने चालत विविध ठिकाणांहून सुमारे ६ ते ८ इंच खोलीचे गड्डे घेऊन माती गोळा करावी. प्रत्येक ठिकाणी वरची माती बाजूला काढून मधली मातीच एकत्र करावी. ही माती स्वच्छ कापडावर अर्धा ते एक दिवस सुकवावी, चाळावी आणि त्यातून सुमारे एक किलो माती अंतिम नमुन्यासाठी घ्यावी. हा नमुना एका स्वच्छ पिशवीत भरून, त्यावर शेतकऱ्याचं नाव, गाव, गट क्रमांक, पीक प्रकार, व नमुना घेतल्याची तारीख यासह सर्व माहिती लिहावी आणि तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. यामुळे मातीतील अन्नद्रव्यांचं अचूक विश्लेषण होऊन पुढील पीक निवड आणि खत व्यवस्थापन योग्यरीत्या करता येतं.

माती परीक्षण म्हणजे काय?

शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला आजार वाटतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊन ब्लड टेस्ट करून घेतो, तसं आपल्या जमिनीचं आरोग्य तपासण्यासाठीही एक चाचणी असते – ती म्हणजे माती परीक्षण. या चाचणीतून आपल्या मातीतील अन्नद्रव्यांची माहिती मिळते. कोणत्या घटकांची कमतरता आहे, कुठले खत द्यावं लागेल, हे सगळं स्पष्ट होतं.

माती परीक्षण का करावं लागतं?

माती परीक्षण केल्याने खतं अचूक प्रमाणात देता येतात. उगाचच जास्त खतं टाकून जमिनीचा पोत खराब होत नाही. शिवाय पीक नीट वाढतं, खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते.

माती नमुना कसा घ्यावा?

सर्वात पहिला प्रश्न येतो – नमुना कुठून घ्यायचा? आणि त्याहूनही महत्त्वाचा – कुठून घेऊ नये?

झाडांच्या खाली, शेणखत टाकलेल्या भागातून, शेताच्या बांधालगत किंवा जिथे गुरं बांधलेली असतात अशा जागांहून माती घेऊ नये. या ठिकाणी मातीचा पोत वेगळा असतो आणि त्यामुळे परीक्षणाचा निकाल अचूक येत नाही.

शेतामध्ये झिगझॅग म्हणजेच ‘Z’ पद्धतीने चालत ६ ते ८ ठिकाणी गड्डे खोदून माती घ्यावी. प्रत्येक गड्डा अंदाजे १५ ते २० सेंटीमीटर खोल असावा. गड्डा करताना सुरुवातीची वरची १ इंच माती बाजूला काढून टाकायची. माती खोदण्यासाठी शक्यतो लाकडी काठीच वापरावी, कारण लोखंडी गज किंवा फावड्यांमुळे मातीमध्ये धातूचे अंश जाऊ शकतात.

अर्धा किलो माती नमुना तयार करण्याची सोपी पद्धत

प्रत्येक ठिकाणाहून सुमारे एक किलो माती गोळा करावी. सर्व माती एकत्र करून स्वच्छ पोत्यावर टाकावी आणि नीट मिसळावी. नंतर हाताने चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग बाजूला काढून उरलेली माती पुन्हा मिसळावी. ही प्रक्रिया पुन्हा करायची, जोपर्यंत आपल्याकडे सुमारे अर्धा किलो माती राहते.ही उरलेली माती म्हणजेच आपला मुख्य नमुना.

माती कुठे भरावी आणि कुठे द्यावी?

हा नमुना कापडी पिशवीत भरावा. प्लास्टिक पिशवी टाळावी कारण त्यात हवा खेळत नाही. एकदा नमुना घेतला की तो शक्यतो एक-दोन दिवसातच जवळच्या माती परीक्षण केंद्रात पाठवावा.

जिल्हा किंवा तालुक्याच्या कृषी विभागात, आत्मा योजनेच्या केंद्रात किंवा कृषी सहाय्यकांच्या मदतीने तुम्ही नमुना देऊ शकता.

माती परीक्षणातून काय कळतं?

परीक्षणाद्वारे आपल्याला मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या प्रमुख अन्नद्रव्यांची माहिती मिळते. याशिवाय सूक्ष्म घटक, सेंद्रिय घटक म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन, पीएच आणि विद्युत चालकता यांचं प्रमाणही कळतं.सरकार यावर आधारित सॉईल हेल्थ कार्ड देते, जे तुमच्या जमिनीबद्दलची संपूर्ण माहिती एका कागदावर देते.

माती परीक्षण कसे करावे निष्कर्ष

माती परीक्षण कसे करावे, माती परीक्षण करणं ही फक्त एक प्रक्रिया नाही, ती आपल्या शेतीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. खरीप पेरणीपूर्वी माती परीक्षण केल्यास खताचा अपव्यय टाळता येतो, अचूक नियोजन करता येतं आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. जर माणसाचं आरोग्य तपासण्यासाठी ब्लड टेस्ट गरजेची असेल, तर शेतीसाठी माती परीक्षण तितकंच महत्त्वाचं आहे.

Leave a Comment